द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानविरुद्ध होणार मालिका
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरुद्ध होणाऱया टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी अष्टपैलू आंद्रे रसेलला पुनरागमनाची संधी दिली आहे. विंडीज संघ टी-20 विश्वचषकाचा विद्यमान विजेता असून यावर्षी भारतात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ते तयारी करीत आहेत.
मार्च 2020 नंतर रसेलने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र विंडीज, लंका व भारतातील टी-20 लीगमध्ये तो सहभागी झाला होता. डावखुरा फलंदाज शिमरॉन हेतमेयर, गोलंदाज शेल्डॉन कॉट्रेल, ओशेन थॉमस व हेडन वॉल्श ज्युनियर यांचेही 18 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. कीरन पोलार्डकडे या संघाचे नेतृत्व असेल. ‘आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. पाच वर्षापूर्वी आम्ही जेतेपद मिळविले होते. ते स्वतःकडेच राखण्यासाठी आगामी काही महिने आम्हाला कसून तयारी करावी लागणार आहे. तिसऱयांदा या स्पर्धेचे चॅम्पियन होण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे,’ असे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक फिल सिमॉन्स म्हणाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गेनाडा येथे 26 जूनपासून सुरू होईल. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिका होणार आहेत.
विंडीजचा टी-20 संघ ः पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन ऍलेन, ड्वेन ब्रॅव्हो, कॉट्रेल, एडवर्ड्स, फ्लेचर, गेल, हेतमेयर, जेसॉन होल्डर, अकील हुसेन, एव्हिन लेविस, ओबेद मकॉय, रसेल, लेंडल सिमन्स, केव्हिन सिन्क्लेअर, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर.