अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्येही ‘गाजर’ गवताने घातलेले थैमान आजही कित्येक ठिकाणी सुरू आहे. या गवताला ‘काँगेस गवत’ असेही म्हणतात. (याच नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे). या गवताचे वैशिष्टय़ असे की, ते जेथे उगवते तेथे अन्य स्थानिक वनस्पती उगवत नाही. भूमी नापीक होते. शिवाय या गवताच्या वाढीचा वेग प्रचंड असतो. यामुळे इतर वनस्पती त्यांना पोषक द्रव्ये न मिळाल्याने नष्ट होतात. असाच उच्छाद ‘किकर’ नामक विदेशी वनस्पतीने सध्या दिल्लीच्या सेंट्रल रीज परिसरात मांडला आहे. ही विषारी वनस्पती असून ती स्थानिक वनस्पतींच्या मुळावर उठली आहे. मात्र, समाधानाची बाब अशी की यावर आयुर्वेदिक वनस्पतींचा रामबाण उपाय शोधण्यात यश आले आहे.
किकर ही केवळ स्थानिक वनस्पतींसाठीच नव्हे तर भूमीतील पाण्यासाठीही धोकादायक आहे. हे झाड पाणी मोठय़ा प्रमाणात घेते. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे त्याच्या प्रदेशातील भूजलस्तर झपाटय़ाने खालावतो. परिणाम म्हणून स्थानिक वनस्पतींना पाणी न मिळाल्याने त्या सुकून जातात.
आयुर्वेदिक औषधांच्या काही वनस्पती या किकर झाडांच्या अवती भोवती वाढून त्यांची ‘कोंडी’ करतात असे दिसून आले आहे. त्यामुळे अशा वनस्पतींची लागवड किकरने व्यापलेल्या प्रदेशात केली जात आहे. या आयुर्वेदिक वनस्पती किकर झाडांच्या भोवती झपाटय़ाने वाढतात आणि त्यांचे अन्नपाणी बंद करून त्यांना मारतात. निदान त्यांची वाढ खुंटवतात. हा उपाय प्रभावी ठरत आहे.