हेस्कॉमचा सावळा गोंधळ : कर्मचाऱयांची संख्या वाढविण्याची गरज : ग्राहकांना पाहावी लागते वाट
प्रतिनिधी / बेळगाव
विजेचे कनेक्शन देण्यापूर्वी विद्युत मीटरची तपासणी केली जाते. हेस्कॉमने गांधीनगर येथे लाखो रुपये खर्च करून मीटर टेस्टिंग
लॅब (एमआरटी) सुरू केली आहे. परंतु हे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रयोशशाळेमध्ये केवळ एकच कर्मचारी असल्याने मीटर तपासणीसाठी वेळ लागत आहे. हेस्कॉममधील या सावळय़ा गोंधळाचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे.
मोठा गाजावाजा करीत हेस्कॉमच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते गांधीनगर येथे अत्याधुनिक मीटर टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. मीटरची तपासणी करून ते वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरत होती. परंतु ही प्रयोगशाळा सध्या कर्मचाऱयांविना कुचकामी ठरत आहे. केवळ एकाच कर्मचाऱयाला सर्व मीटरची तपासणी करून त्याला सील द्यावे लागत आहे. यामुळे मीटर तपासणीसाठी वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कर्मचाऱयांची संख्या वाढविण्याची गरज
बेळगाव विभागात दररोज 400 हून अधिक सिंगल फेज तर 100 हून अधिक थ्रीफेज मीटरची आवश्यकता भासत असते. बेळगाव विभागाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने मीटरची आवश्यकता भासत आहे.
मीटरची आवश्यकता जनतेतून जरी वाढली असली तरी या कार्यालयात एकच कर्मचारी असल्याने त्याच्यावर जबाबदारी वाढली आहे. त्या कर्मचाऱयाला इतर कामेही लावण्यात येत असल्याने मीटर टेस्टिंग वेळेत होत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. त्यामुळे मीटर टेस्टिंग प्रयोगशाळा विभागात कर्मचाऱयांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
अधिकाऱयांचा निष्काळजीपणा ग्राहकांसाठी तापदायक
मीटर कंपनीकडून तपासणी करूनच मीटर पाठविले जातात. परंतु हेस्कॉमकडून पुन्हा एकदा मीटरची खातरजमा करून ते सील करून ग्राहकांना देण्यात येतात. दररोज अंदाजे 500 मीटरची आवश्यकता असल्याने त्यांना वेळीच सील करून ग्राहकांना देणे गरजेचे असते. परंतु हेस्कॉम अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांना मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे.