लष्करी जवान ताब्यात, एमएलआयआरसीकडे सोपविले
प्रतिनिधी/ बेळगाव
सुट्टी संपवून लष्करीसेवेत परतणाऱया नायक सुभेदारजवळ एके-47 चे एक जिवंत काडतूस आढळले आहे. शनिवारी सायंकाळी सांबरा विमानतळावर तपासणी करताना काडतूस आढळले असून याबरोबरच इन्सास-01 ची एक पुंगळीही सापडली आहे.
संकेश्वर येथील नायक सुभेदार अरुण मारुती भोसले यांच्याकडे काडतूस आढळले आहे. ते सध्या सुट्टीवर होते. सुट्टी संपल्यामुळे विमानाने बेंगळूर ते दिल्ली व तेथून जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी शनिवारी सायंकाळी ते सांबरा विमानतळावर आले. त्यावेळी तपासणी करताना जिवंत काडतूस आढळल्याने खळबळ माजली आहे. केएसआयएसएफ व पोलिसांच्या तपासणीत अरुण यांच्याकडे काडतूस आढळल्याने त्यांना तातडीने मारिहाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी रात्री उशिरापर्यंत या जवानाची चौकशी केली.
त्यानंतर पुढील तपासासाठी या जवानाला एमएलआयआरसीच्या अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी आधी एमएलआयआरसीला यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर एक जिवंत काडतूस, एक पुंगळी व जवानाला त्यांच्याकडे सोपविण्यात आले. यासंबंधी मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता मराठा लाईट इंन्फट्रीचे अधिकारी पुढील तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.