ऑनलाईन टीम
भारतीय क्रिकेट संघाच्या वन-डे, कसोटी आणि टी-२० कर्णधारपदी असलेल्या विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. विराटने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराटने याबाबत स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट करत या निर्णयाविषयी सविस्तर लिहिले आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं या पत्रात म्हटलं आहे. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचेही त्यांने या पत्रात म्हटलं आहे.
विराटने काय म्हटलंय या पत्रात..
“फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला सुदैवी समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो”.
“आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळं काही संघाला दिलं आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.”