प्रतिनिधी / सातारा :
सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन प्रकारात 8 तास 13 मिनिटे 21 सेकंद स्तब्ध राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून, तिला गोल्ड मेडल, सर्टीफिकेट, बँच होल्डर देवून सन्मानित करण्यात आले आहे.
जान्हवी इंगळे सातारा जिल्ह्यातून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणारी पहिली युवती आहे. तिने यापूर्वी सलग 5 तास 1 मिनिट 17 सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन प्रकारात पहिला विश्वविक्रम केला. महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये 1 तास 19 मिनिटे 34 सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम केला.
जान्हवी गेली 14 वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत. इंटरनॅशनल आणि कॉर्पोरेट योगा ट्रेनर आहेत.