निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचा जुन्या आठवणींना उजाळा, 64 व्या वाढदिवसाप्रसंगी वृत्तसंस्थेशी खास संवाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिलीप वेंगसरकर आजही गुणवत्ता हेरण्याच्या त्यांच्या अनोख्या सर्वोत्तम हातोटीमुळे आजवरचे सर्वोत्तम निवड समिती अध्यक्ष मानले जातात आणि स्वतः कर्नलनी विराटला वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत हेरले, त्यावेळी ती त्यांची भविष्यातील सर्वोत्तम निवड ठरली. वेंगसरकर यांनी मंगळवारी 64 व्या वर्षात पदार्पण केले. याप्रसंगी त्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधला. कर्नलनी 2006 ते 2008 या कालावधीत निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत असताना कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना संधी दिली होती.
‘गुणवत्ता हेरण्यात एखादी व्यक्ती वाकबगार असू शकते. पण, गुणवत्ता हेरल्यानंतर आपण पुढे काय करतो, ते अधिक महत्त्वाचे असते. जर एखादा खेळाडू गुणवान असेल तर त्याला संघात घ्यायला हवे आणि खेळण्याची सातत्याने संधीही द्यायला हवी’, असे वेंगसरकर यावेळी म्हणाले.
टीआरडीडब्ल्यूच्या अनुभवाचा फायदा
बरखास्त केल्या गेलेल्या टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विंग (टीआरडीडब्ल्यू) अध्यक्षपदाची जबाबदारी वेंगसरकरांनी सांभाळली होती. त्या अनुभवाचा निवड समिती अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहताना उपयोग झाला, असे त्यांनी येथे सांगितले. या विंगचे काम पाहत असताना धोनी कर्नलच्या नजरेस पडला होता.
विराट कोहलीबद्दल बोलत असताना वेंगसरकरांच्या बोलण्यात अधिक अभिमान होता. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी उदयोन्मुख खेळाडूंचा संघ निवडताना त्यांनी विराटला संधी दिली, त्यावेळी विराटने आवश्यकतेनुसार, अगदी सलामीला फलंदाजीला उतरण्याचीही तयारी दर्शवली होती. कर्नलना त्याचा हा पुढाकार विशेष भावला होता.
‘विंगचे काम पाहताना मी 16 वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटातील बरेच क्रिकेट पाहिले होते. त्यामुळे, निवड समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मी विराटला ताबडतोब संधी दिली. त्याला आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी युवा संघातून निवडले. मी त्याला फलंदाजी करताना पाहिले, त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करु शकेल, याचा मला अंदाज आला होता. आता प्रदीर्घ कालावधीसाठी एखादा खेळाडू आपला दबदबा राखू शकेल का, हे त्यावेळी सांगणे कठीण होते. पण, त्यासाठी आवश्यक कौशल्य मी विराटमध्ये पाहिले होते’, असे कर्नल पुढे म्हणाले. एखाद्या खेळाडूत गुणवत्ता आहे, हे हेरल्यानंतर प्रत्येक निवडकर्त्याकडे देखील त्याला संधी देण्याचे काळीज, धाडस असायला हवे. माझ्या दृष्टीने निवडकर्त्याची ही जबाबदारी अधिक महत्त्वाची असते’, याचा त्यांनी शेवटी उल्लेख केला.
जेव्हा 21 वर्षांच्या धोनीला 19 वर्षांच्या संघात घेतले गेले!
वेंगसरकर यांनी धोनीला तो वयोगटात बसत नसताना देखील नियम धाब्यावर बसवून कशी संधी दिली, याचाही किस्सा यावेळी सांगितला.
धोनी त्यावेळी 21 वर्षांचा होता आणि टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विंगच्या नियमानुसार, 19 वर्षावरील खेळाडूंना संधी दिली जात नव्हती. बंगालचे माजी कर्णधार प्रकाश पोद्दार त्यावेळी वेंगसरकरांच्या विंग संघातून 19 वर्षाखालील सामना पाहण्यासाठी जमशेदपूरला गेले. तो सामना नेहमीच्या किनन स्टेडियमऐवजी अन्यत्र खेळवला जाणार होता. ते सर्व स्टेडियमवर पोहोचले, त्यावेळी एक युवा फलंदाज बहुतांशी चेंडू षटकारासाठी पिटाळून लावत होता. पोद्दारनी त्या फलंदाजाचे नाव विचारले तर उत्तर आले महेंद्रसिंग धोनी! पण, तो वयात बसत नव्हता, ही अडचण होती. पण, वेंगसरकरांनी पुढाकार घेत एखाद्या गुणवान खेळाडूच्या आड वयाचा मुद्दा येऊ नये, असा युक्तिवाद मांडला आणि त्यावेळी धोनीची संघात वर्णी लागली होती!
जगमोहन दालमिया यांच्याबद्दल विशेष आदर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सर्वेसर्वा जगमोहन दालमिया यांच्याबद्दलही कर्नलना बराच आदर आहे आणि त्यांनी तो या मुलाखतीदरम्यान मांडला. जगमोहन दालमिया यांनीच टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विंग सुरु केली होती. अर्थात, नंतर ते निवडणूक हरले आणि त्यांची विंगची कल्पनाही गुंडाळली गेली. वेंगसरकर पुढे निवड समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बेंच स्ट्रेंथ भक्कम का असावी, यावर भर दिला आणि यामागेही त्यांना विंगच्या अनुभवाचाच फायदा झाला.
राष्ट्रीय अकादमीच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी
दिलीप वेंगसरकर यांनी यादरम्यान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सध्याच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही व्यवस्थापनात असताना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे कामकाज उत्तम होते. पण, आता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच जणू बदलून गेला आहे. आताच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे फक्त दुखापत झालेल्या खेळाडूंच्या पुनर्वसनाचे पेंद्र म्हणून पाहिले जात आहे’, अशी खंत त्यांनी येथे नोंदवली.