वार्ताहर/ कराड
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱयांना मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी तिघा जणांविरोधात कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाण झाल्यानंतर वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी गौरव दिगंबर शेळके (वय 34, वरिष्ठ तंत्रज्ञ) यांनी फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हणमंत धर्मे, विनय धर्मे, प्रथमेश धर्मे (सर्व रा. रेठरे बुदुक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या कराड ग्रामीण विभागातील रेठरे बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी वैभव राजमाने यांनी थकीत वसुलीसंदर्भात सूचना देत कर्मचाऱयांना वसुलीसाठी पाठवले. त्यानुसार कर्मचारी गौरव शेळके, सुरेश नामदेव जाधव, राजेंद्र रघुनाथ नायकवडी, बाबासाहेब चंद्रू बाबर व गणेश धोंडिराम पवार हे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रेठरे बुद्रुक येथील हणमंत विश्वनाथ धर्मे यांच्याकडील थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी हणमंत धर्मे यांनी वीज बिल देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी हणमंत धर्मे यांच्यासह त्यांचा मुलगा विनय हणमंत धर्मे व प्रथमेश धर्मे यांनी कर्मचाऱयांना मारहाण केली. तुच आमचे वीज कनेक्शन तोडायला सांगितले आहे, असे म्हणून गौरव शेळके यांच्यावर धावून गेले.
याप्रकरणी वीज कर्मचाऱयांच्या वतीने कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कर्मचाऱयांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी व कर्मचाऱयांनी तालुका पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मारहाण करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महावितरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुदिले, कराड ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता स्वप्नील जाधव, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे जिल्हा सचिव राम चव्हाण, अमोल जाधव, सारंग सुतार व कर्मचारी उपस्थित होते.
अधिकाऱयांचे कातडी बचाव…
महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशानुसार कर्मचारी वसुलीसाठी थकबाकीधारकांकडे जातात. मात्र थकाबकीधारकांकडून वीज कर्मचाऱयांना मारहाण झाल्यानंतर अधिकाऱयांनी कातडी बचावची भूमिका न घेता गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतः पुढे येणे गरजेचे आहे. दुदैवाने मारहाण झालेल्या कर्मचाऱयांनाच गुन्हे दाखल करावे लागत आहेत. तांत्रिक कामगार संघटना मात्र कर्मचाऱयांना वाऱयावर सोडणार नाही. कर्मचाऱयांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱया संघटनेविषयी अधिकारी अपशब्द वापरणार असेल तर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा संघटनेचे सातारा जिल्हा सचिव राम चव्हाण यांनी दिला आहे.