ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
दीड वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला याची माहिती अद्याप जगासमोर आली नाही. चीनच्या वुहान लॅबमधून हा व्हायरस जगभरात पसरल्याचा आरोप अमेरिकेसह अन्य देशांनी चीनवर केला. मात्र, हे आरोप चीनने फेटाळले. अखेर अमेरिकेच्या एका गोपनीय अहवालातून वुहान लॅबविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, कोरोनाची माहिती जगासमोर येण्यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या तीन संशोधकांना कोरोनासारखी लक्षणे होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीत जगाला कोरोनाची माहिती मिळाली. दरम्यान, वुहानमध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे वुहानमधील लॅबमधूनच कोरोना विषाणू पसरवला गेला असा अनेकांना संशय आहे.
कोरोनाचा उगम नेमका कसा झाला, याचा तपास जागतिक आरोग्य संघटना करत आहे. लवकरच ही संघटना तपासाचा पुढील टप्पा जगासमोर आणणार आहे.