कैदी मृत्यूप्रकरण : सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा नाही
सावंतवाडी:
येथील कारागृहात मृत्यू झालेल्या राजेश गावकर (44, रा. नारिंग्रे-देवगड) याचा शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय प्रयोगशाळेतून लवकरच प्राप्त होणार आहे. त्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.
कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत राजेश गावकर याचे शवविच्छेदन करण्यात आले होते. प्राथमिक अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच राजेश गावकर याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. राजेश गावकर याला आकडी येण्याची सवय होती. त्यामुळे आकडी येऊन पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली की अन्य कारणामुळे, हे अहवालातच स्पष्ट होणार आहे. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात आले आहे. मात्र, त्यात काहीही संशयास्पद दिसून येत नाही. त्यामुळे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला, याच उलगडा होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.