प्रतिनिधी / सोलापूर
रात्रीचे जेवण घेऊन गेलेल्या प्रियकराला घरात कोंडून लाल-पिवळ्या ओढळीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱया प्रेयसीविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विजापूर रोडवरील रेणुका नगरात दोन जानेवारीच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दुसऱया दिवशी दुपारी तरुणाच्या आईने इतरांच्या मदतीने मुलाची सुटका केली.
याबाबत पोलिसांकडून †िमळालेली माहिती अशी की, प्रकाश बळीराम सातपुते (वय 35, रा. सन्मती नगर, भारती विद्यापीठजवळ, विजापूर रोड, सोलापूर) हे एका ब्लड बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचे विजापूर रोड परिसरातील तरुणीबरोबर मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. यातूनच सातपुते यांचे तरुणीच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरु होते. या दरम्यानच्या काळात तरुणीने सातुपते यांना ‘तू माझ्याबरोबर लग्न कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही’ असे म्हणून अनेकवेळा धमकी दिली होती. दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातपुते हे नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन तरुणीच्या घरी गेले होते. त्याचवेळी सातपुते यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. त्यामुळे सातपुते यांनी प्रेयसीला ते घरी जाणार असल्याचे सांगितले. यावर त्या तरुणीने घराच्या दरवाज्याला आतून कडी लावून घेतली.
त्यावेळी सातपुते हे प्रेयसीसाठी आणलेला जेवणाचा डबा बेडरुममध्ये ठेवण्यासाठी गेले. याच संधीचा फायदा घेत, पाठीमागून येऊन तरुणीने तिच्याकडील लाल-पिवळ्या रंगाच्या ओढणीने गळा आवळला आणि ‘तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर, मी तुला जिवंत सोडणार नाही’ म्हणत आणखी जोराने गळा आवळला. गळा आवळल्याने सातपुते यांच्या डोळ्याला अंधारी येऊन ते बेशुध्द पडले. 3 जानेवारीच्या पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातपुते यांना जाग आली. त्यावेळी सातपुते यांची प्रेयसी त्यांच्या गळ्याला बोरोप्लस क्रिम लावत होती. त्यावेळीही सातपुते यांनी घरी जाण्याविषयी प्रेयसीकडे विनंती केली. मात्र पेयसीने त्यांना घराबाहेर सोडले नाही.
लोकांच्या मदतीने आईने केली सुटका
शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सातपुते यांची आई व ब्लड बँकेतील काही लोक तेथे आले. त्यांच्या समोरही त्या तरुणीने ‘मी त्याला सोडणार नाही’, म्हणून सातपुते यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सातपुते यांच्या आईने लोकांच्या मदतीने सातपुते यांची त्यांच्या प्रेयसीच्या ताब्यातून सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत प्रियकर बळीराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विजापूर नाका पोलीस ठाण्यात प्रेयसीविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के करीत आहेत.