प्रतिनिधी / बेळगाव
वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर यांची पत्नी आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुधाकर यांचे वडील आणि त्यांच्या घरातील स्वयंपाकी यांची कोरोना स्वॅब तपासणी करण्यात आल्यानंतर त्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता सुधाकर यांची पत्नी आणि मुलगी यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सुधाकर आणि त्यांचे दोन मुलगे यांचीही स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यांचा अवहाल निगेटिव्ह आला आहे.
यामुळे आता कोरोनाने राजकीय मंडळींवर वक्रदृष्टि केली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. सुधाकर हे एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाबाधित असणाऱया एका वाहिनीच्या पत्रकाराच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते. आता सुधाकर यांचे वडील, पत्नी आणि मुलगी कोरोनाबाधित झाले आहेत.
सुधाकर यांनी स्वतःच ही माहिती देवून आम्ही लवकर बरे व्हावे, यासाठी ज्यांनी ज्यांनी सदिच्छा दिल्या आहेत त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे टिव्ट त्यांनी केले आहे.