नवी दिल्ली
देशातील तिसऱया नंबरची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचा निव्वळ तोटा चालू वित्त वर्षात 2020-21 मधील एप्रिल ते जून या तिमाहीत वधारुन 25,460 कोटी रुपयांच्या घरात पाहोचला आहे. सर्वाधिक थकबाकीमुळे कंपनीचा तोटा वाढत गेल्याचेही सांगितले आहे.
व्होडाफोन आयडिया यांच्याकडून शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एक वर्षाअगोदर समान तिमाहीत कंपनीला 4,874 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच कंपनीचा महसूल हा 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत घटून 10,659.3 कोटींवर पोहोचला आहे. जो एक वर्षापूर्वी 11,269.9 कोटी रुपये होता.
कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे म्हटले आहे. यात पहिल्या तिमाहीतील वित्तीय परिणामांवर हा प्रभाव पडल्याचे व्होडाफोन आयडियाचे मुख्य संचालक रविंद्र टक्कर यांनी म्हटले आहे.