ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली दंगलीशी संबंधित खटल्यातील आरोपी शरजील इमामवर देशद्रोहाचा खटला चालविण्यात येणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करताना केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे त्याच्यावर देशदोह, यूएपीएसह अन्य कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
डिसेंबर 2019 मध्ये शरजीलने उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया परिसरात सीएएविरोधात भाषणे दिली होती. त्यामुळे आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नवी दिल्ली आणि मणिपूर या पाच राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन बिहारमधून त्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, न्यायालयाने शरजीलची ती भाषणे चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, शरजील इमामवर आयपीसीच्या सेक्शन 124 ए (देशद्रोह), 153 ए, 153 बी आणि 505 आणि यूएपीएच्या सेक्शन 13 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. ऍडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हा निर्णय दिला आहे.