ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना दिल्लीमध्ये आज मोठी घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २५ मिनिटं चर्चा सुरु होती. मोदी-पवार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण पवार आणि मोदींमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हा विषय मात्र गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयात भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात असून राज्यात होत असलेल्या कारवाईवरून ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. पण शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याआधीही भेटी झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची प्रधानमंत्री कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत या दोन नेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणी उपस्थित नसल्याचं समजत आहे. पण यावेळी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.