शस्त्रास्त्र निर्यातदार होण्याच्या दिशेने वाटचाल
वृत्तसंस्था/ लखनौ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ येथे आयोजित 11 व्या डिफेन्स एक्स्पोचे (संरक्षणसामग्री प्रदर्शन) बुधवारी उद्घाटन केले आहे. भारत आता केवळ बाजारपेठ नसून पूर्ण जगासाठी मोठी संधी देखील आहे. हा डिफेन्स एक्स्पो जगाचा भारतावरील विश्वास दर्शविणारा आहे. जगात भारत एक ठाम भूमिकेसह वाटचाल करत असल्याचे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांनी संरक्षण उत्पादन वाढविण्याऐवजी आयातीवर भर दिला होता. या धोरणामुळे भारत शस्त्रास्त्रनिर्मितीत मागे पडला आहे. 2014 मध्ये रालोआ सरकार स्थापन झाल्यावर मेक इन इंडियाच्या बळावर चित्र बदलले असून भारत आता शस्त्रास्त्रांचा निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मेक इन इंडियामुळे भारताची सुरक्षा वृद्धिंगत होणार असून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. डिफेन्स एक्स्पोची व्यापकता आणि वैविध्य तसेच जागतिक भागीदारी त्याचा मोठा पुरावा आहे. संरक्षण संशोधनात तरुणाईच्या सहभागाला चालना देण्यासाठी 5 नवे प्रकल्प स्थापन करण्यात आले आहे. एफडीआयचे नियम सुलभ करण्यात आले असून याद्वारे 100 टक्के थेट गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
तामिळनाडू आणि उत्तरप्रदेशात संरक्षण कॉरिडॉरची निर्मिती होत असून यातून तरुणाईला रोजगार मिळणार आहेत. अमेठीच्या कोरबामध्ये रायफल निर्मितीचा प्रकल्प रशियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात एके-203 ची निर्मिती होणार आहे. 200 नवे संरक्षण विषयक स्टार्टअप सुरू करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.
भारतात जगाचे एअरोस्पेस हब ठरण्याची क्षमता आहे. देशात गुणवत्ता, तंत्रज्ञानासह मागणी आणि निर्णयक्षमता देखील आहे. भारतात गुंतविलेला प्रत्येक पैसा नफा मिळवून देणार असल्याचे मोदी म्हणाले.
सर्वसामान्यांचा प्रवेश
5 ते 9फेब्रुवारीपर्यंत चालणाऱया या प्रदर्शनात 70 देशांच्या संरक्षण उपकरण निर्मिती करणाऱया 172 तर भारताच्या 857 कंपन्या सहभागी होत आहेत. या संरक्षण प्रदर्शनात 40 देशांचे संरक्षणमंत्री सामील होतील. डिफेन्स एक्स्पोत 5 ते 7 फेब्रुवारीपर्यंत निमंत्रित लोकांनाच प्रवेश असणार आहे. तर 8-9 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार आहे. डिफेन्स एक्स्पोत 19 तांत्रिक-व्यावसायिक चर्चासत्रांचे आयोजन होईल. तसेच या प्रदर्शनात सुमारे 5 हजार विद्यार्थी सामील होणार आहेत. येथे दसॉ एव्हिएशन पहिल्यांदाच तिरंग्याचे चिन्ह असलेले राफेल विमान सादर करणार आहे.
मोदींनी साधला निशाणा
पंतप्रधान मोदींनी डिफेन्स एक्स्पोतील शस्त्रास्त्रांची माहिती जाणून घेतली आहे. व्हर्च्युअल रायफल सिस्टीम पडताळण्यासाठी मोदींनी स्वतः लक्ष्य भेदले आहे. एकही गोळी न वापरता या व्हर्च्युअल रायफलद्वारे एका मागोमाग एक अनेक लक्ष्यांचा त्यांनी भेद केला आहे. पंतप्रधानांनी एका रोबोशी हस्तांदोलनही केले आहे.
वृंदावन मैदानात शस्त्रास्त्रांचा मेळा
सैन्याच्या शस्त्रास्त्रांमध्ये पिनाक मल्टी बॅरल रॉकेट लाँचर, धनुष्य तोफ, इंटीग्रेटेड मल्टीफंक्शन साइट, स्मॉल आर्म्स ऍडव्हान्स्ड होलोग्राफिक साइट, आय सेफ लेझर, नाइट व्हिजन डिव्हायसेज, बॉर्डर सर्व्हिलान्स सिस्टीम, लेझर ऑर्डिनेन्स डिस्पोजल सिस्टीम, लेझर डॅझलर्स, ऑप्टिकल टारगेट लोकेटर आणि एक्स्प्लोसिव्ह डिटेक्टर मांडले जाणार आहेत. तर लढाऊ विमानांमध्ये सुखोई-30 एमकेआय, जग्वार तर चिनूक आणि चीता हेलिकॉप्टरही लखनौ विमानतळावरून झेपावणार आहेत.