शिवाजी उद्यान येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक : विविध संघटनांकडून पूजन
प्रतिनिधी / बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे यावषी हिंदू तिथीनुसार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते शहापूर येथील शिवाजी उद्यान येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने पाळणा गीत म्हणून शिवजयंतीचा सोहळा पार पडला.
शिवभक्तांना मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण हिंदू म्हणून जगतो आहोत ते हिंदवी स्वराज्यामुळे. आपण महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, कल्लाप्पा पाटील, अंकुश केसरकर, किरण बडवाण्णाचे, गजानन पवार, अतुल केसरकर, व्यंकटेश पाटील, शंकर भातकांडे, आनंद कांबळे, गजानन पाटील, विजय कुंटे, सदानंद मजुकर, प्रमिला पाटील, पूजा किणेकर, श्रृती धारपवार यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा शिवसेना
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने बुधवारी छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी व जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, बाळासाहेब डंगरले, दत्ता जाधव, विजय सावंत, राजकुमार बोकडे, प्रसाद काकतकर, प्रकाश हेब्बाजी, रविंद्र जाधव, राजू कणेरी, निरंजन अष्टेकर, विठ्ठल नाईक यांच्यासह इतर उपस्थित होते.
म. ए. युवा समिती
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सचिव श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, विनायक काळवे, वासू सामजी, सागर पाटील, नारायण मुचंडीकर, राजू कदम, अश्वजित चौधरी, विराज मुरकुंबी, उदय पाटील, दर्शन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला आघाडीतर्फे शिवजयंती साजरी
बेळगाव : महिला आघाडीतर्फे तिथीप्रमाणे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला व मूर्तीचे पूजन केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व सदस्या उपस्थित होत्या.