प्रतिनिधी / बेळगाव
आज सर्वच हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रक्त वेळेवर मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. रोड अपघात, डायलेसीस, एखादी शस्त्रक्रिया करताना रुग्णाला हवे असलेले रक्तगट मिळण्यास बराच वेळ लागत आहे. ही समस्या जाणून घेऊन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रक्तदान करण्यात आले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर रक्तदान शिबिर नेहरुनगर येथील बसवाणा मंदिरात पार पडले. प्रारंभी शिवजयंतीनिमित्त बसवाणा मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी एकूण 50 जणांनी रक्तदान केले. यावेळी संकलित केलेले रक्त केएलई हॉस्पिटलच्या ब्लड बँकला देण्यात आले. तसेच याप्रसंगी कोरोना काळात आपली जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स यांनी रुग्णांची सेवा केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिरात रविना कदम, नीता पाटील या दोन महिलांनी देखील रक्तदान केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, कार्यवाह विश्वनाथ पाटील, महेश जुवेकर, सुरेंद्र कदम, गजानन पाटील, किरण बडवाण्णाचे, आकाश ठक, विशाल खंडागळे, यशवंत पाटील, भावक्काणा पाटील, प्रमोद चौगुले, राहुल बडस्कर, किशोर ठक, राजू भोसले, दीपक चौगुले, संतोष पाटील यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.