सातारा / प्रतिनिधी :
शहरात प्रामुख्याने करंजे, मंगळवार पेठ, सदरबाजार, गोडोली या भागात डेंग्यूची साथ सुरु आहे. अनेक रुग्ण खासगी, सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचा फैलाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज पूर्णतः कोलमडले आहे. कसलीही उपाययोजना होताना दिसत नाही. एवढेच काय तर असणाऱ्या सर्वच धुर फवारणी मशिन्स बंद पडल्या आहेत. त्यामुळे खासगी मशिनने धुर फवारणी करा, अशी मागणी करत आहेत. याकडे पालिकेच्या पदाधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाची उघडझाप सुरु असल्याने अशा वातावरणात डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. शहरात असे वातावरण असल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून गोडोली, करंजे, मंगळवार पेठ, सदरबाजार, गोडोली या भागात डेंग्यूची साथ उदभवली आहे. डेंग्यूची साथ उदभवल्याने अनेक जण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी त्या परिसरात धुर फवारणी होणे गरजेचे आहे. त्याकरता सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेली दहाच्या दहा धुर फवारणी मशिन्स बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी जर धुर फवारणी आमच्या प्रभागात करा अशी विनंती केली असता सर्वच मशिन्स बंद आहेत, असे सांगण्यात येते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.