प्रतिनिधी /बेळगाव
सणांची सम्राज्ञी समजल्या जाणाऱया दिवाळीच्या मंगलमय पर्वाला सोमवारपासुन प्रारंभ झाला. सोमवारी शहर परिसरात आणि प्रामुख्याने गो शाळांमध्ये तसेच गवळी बांधवांनी गाय वासराची पुजा केली. सायंकाळी 6.5 वा ते 8.35 वा. पर्यंत वसुबारसचा मुहूर्त होता.
भारतीय सण परंपरा ही कृषी संस्कृतीशी जोडली गेली आहे. दिवाळीची सुरूवात वसुबारस पुजेने झाली. वसुबारस म्हणजे बळीराजाची संपत्ती, म्हणूनच या दिवशी शेतकरी आपल्या पशुधनाची पूजा करतात. शेतकरी आणि गवळी बांधवांनी गायीची शास्त्रोक्त पूजा करून तीचे औक्षण केले. यावेळी आज दुर्मिळ झालेली लोकगीतेही त्यांनी म्हंटली.
या दिवशी लक्ष्मीचे आणि सरस्वतीचेही आगमण होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सायंकाळी महिलांनी घराच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळय़ा रेखाटल्या तसेच अज्ञान दुर करणाऱया सरस्वतीचीही पूजा केली. सोमवारी सायंकाळी प्रकाशाच्या सोहळय़ाच्या स्वागतार्थ घरोघरी आकाश दिवेही टांगण्यात आले. आकाश दिव्यांच्या प्रकाशामध्ये शहर उजळून निघाले.