अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 2 नोव्हेंबर 2021, स. 11.00
● रविवारी दिलासा, सोमवारी पुन्हा वाढ
● एकूण 2 हजार 105 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 2.38 टक्के वर
● लसीकरण करून घेण्याचे आवाहन
● लसीकरणात जिल्हा राज्यात पाचवा
सातारा / प्रतिनिधी :
ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग चांगलाच कमी झाला. या दरम्यान पहिल्या पंधरा दिवसात बाधित वाढीचा आलेख 50 ते शंभर यावर स्थिर होता. ऑक्टोबरच्या मध्यानंतर तो हळू हळू 50 च्या खाली जाऊ लागला व ऑक्टोबर संपताना तो 50 च्या खाली गेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या आरंभी रविवारच्या अहवालात फक्त नवीन 22 बाधितांची नीचांकी नोंद दिलासा देऊन गेली असतानाच सोमवारी रात्रीच्या अहवालात मात्र पुन्हा 50 जणांचा अहवाल बाधित आला आहे. कोरोना संपत असताना अचानक वाढणारी बाधित वाढ ही नागरिकांना अद्यापही काळजी घ्या हाच संदेश देत आहे.
सोमवारी अहवालात 50 जण बाधित
मंगळवारी सकाळी देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालात एकूण 2 हजार 105 जणांची तपासणी करण्यात आलेली असून यामध्ये 50 नागरिकांचा अहवाल बाधित आलेला आहे. या अहवालात पॉझिटिव्हिटी दर दुपटीने वाढला असून तो 2.38 टक्के वर आहे.
नागरिकांना लस घेण्याचे आवाहन
ज्यावेळी जिल्ह्यात कोरानाने अक्षरशः कहर केला होता. त्यावेळी लस देण्यास आरंभ झाला. तेव्हा नागरिकांनी रांगा लावल्या. मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाली. मात्र लस मिळवण्यासाठी प्रचंड धडपड सर्वांची सुरू होती. आता जिल्ह्यात शासनाकडून लसीचा पुरवठा चांगला झालेला आहे. त्यामुळे सर्व लसीकरण करण केंद्रावर लस उपलब्ध आहे. मात्र आता नागरिकांकडून लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण पन्नास टक्केच आहे, ते वाढण्याची गरज आहे. एकूण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असून त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे
लसीकरण साडे 28 लाखांनजिक
जिल्हय़ात शासनाकडून लस मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. राज्यात लसीकरण एक सातारा जिल्ह्याचा क्रमांक पाचवा आहे. मात्र सध्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. सोमवारी 5 हजार 298 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 28 लाख 44 हजार 908 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 65 हजार 233 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 69 हजार 106 एवढी झालेली आहे.
जिल्हय़ात सोमवारपर्यंत
एकूण नमुने 22,33,225
एकूण बाधित 2,51,323
कोरोनामुक्त 2,43,482
एकूण मृत्यू 6,431
सक्रीय रुग्ण 535
जिल्हय़ात सोमवारी
बाधित 22
मुक्त 00
मृत्यू 00, उशिरा नोंद 2