चाकूचा धाक दाखवत दागिने पळविले
बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया-घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी लुटमारीचाही प्रकार घडला असून खडेबाजार शहापूर येथील एका सराफी दुकानात शिरलेल्या गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागिने पळविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यासंबंधी शनिवारी रात्री शहापूर पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने सराफी व्यावसायिक भयभीत झाले आहेत. बंगाली कारागिरांनी दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने पळविल्याची मोठी घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे.
उपलब्ध माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी खडेबाजार-शहापूर परिसरात असलेल्या एका सराफी पेढीत हेल्मेट आणि मास्क परिधान केलेला एक तरुण दाखल झाला. काऊंटरवर येवून त्याने सराफी व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून दागिने पळविल्याची घटना घडली आहे. हेल्मेटधारी तरुणाने सुमारे 400 ग्रॅम इतके सोने पळविल्याची चर्चा आहे.