पहाटे झालेल्या महारथाच्या मिरवणुकीला भाविकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 23 ते 26 असा चार दिवस विविध धार्मिक कार्यांसह साजरा झाला. देवीच्या मूर्तीच्या विविध रथांतून काढण्यात आलेल्या मिरवणुका हे त्याचे मुख्य वैशिष्टय़ राहिले. मंगळवारी पहाटे महारथातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने उत्सवाची सांगता झाली. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 23 रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री नमन व शिबिकोत्सव, नंतर श्रीची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद, नंतर संगीत कार्यक्रम ‘स्वरधनू’, दुसऱया दिवशी 24 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, महाभिषेक, रात्री 10 वा. शिबिकोत्सव, नंतर श्रींची मयूर रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद, त्यानंतर कोकणी नाटकाचा प्रयोग असे कार्यक्रम झाले.
तिसऱया दिवशी 25 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव, नंतर श्रींची सूर्यरथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद, नंतर कोकणी नाटक, तर चौथ्या दिवशी 26 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, श्रींस महाभिषेक, रात्री ऑर्केस्ट्रा व पहाटे 6 च्या सुमारास श्रींची महारथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आतषबाजी, आरती, प्रसाद होऊन जत्रोत्सवाची सांगता झाली. उत्सवाच्या काळात दररोज दुपारी व रात्री देवीस महानैवेद्य व भाविकांसाठी महाप्रसाद झाला.
श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटिश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष दिवाकर ना. देसाई, सचिव संतोष ना. देसाई, खजिनदार आनंद ना. देसाई व मुखत्यार मंगेश ना. देसाई यांनी जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, भाविकांनी देवीस अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर वस्तूंचा 28, 29 व 30 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत जाहीर लिलाव केला जाईल, असे अध्यक्ष दिवाकर ना. देसाई यांनी सांगितले आहे.