डोंगर पायथ्याशी भाविकांचे ठाण : संपर्क रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून रस्ते बंद
वार्ताहर /बैलहोंगल
सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवीची दरवर्षी होणारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणारी यात्रा मंदिराचे अधिकारी, मठाचे स्वामी, तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने यल्लम्मा देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तरी काही भाविक गेल्या आठवडय़ापासून डोंगर पायथ्याशी येऊन देवीची आराधना करत धार्मिक कार्यक्रम आटोपून घेत आहेत. शुक्रवार व शनिवारी डोंगराच्या पायथ्याशी व जवळच्या शेतांसह इतर मोकळय़ा जागेत भाविकांनी ठाण मांडले होते.
मंदिर प्रशासनाकडून खबरदारी
कोरोना व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार गेल्या आठ-दहा दिवसांपासून भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भाविकांच्या आरोग्याच्यादृष्टीने मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे, असे मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती यांनी सांगितले.
भाविकांना येण्यास प्रवेशबंदी
यल्लम्मा डोंगरानजीक असलेल्या उगरगोळ, हिरेपुंबी, चुळकी, मुनवळ्ळी, शिंदोगी क्रॉस, रामदुर्ग मार्गावरील हुलीकट्टी, बैलहोंगल मार्गावरील करीकट्टी व धारवाड मार्गावरील संपर्क रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सोमवार व मंगळवारी हिरेमठ स्वामी तसेच मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती व मंदिराच्या पुजाऱयांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा व आरती आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत.