कोरोना व्यवस्थापनाच्या राज्यस्तरीय बैठकीत निश्चित
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील शाळा प्रत्यक्ष मुलांच्या हजेरीत (ऑफ लाईन) सुरू करण्याबाबतचा निर्णय गणेश चतुर्थीनंतर घेण्याचे सरकारने ठरविले असून कोरोना व्यवस्थापनाच्या राज्यस्तरीय बैठकीत तसे निश्चित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टचे निमित्त साधून काही प्रमाणात शाळा सुरू करण्याचा सरकारचा इरादा होता. त्या हेतूने मुलांनी 15 ऑगस्ट शाळेत येऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. परंतु त्यास शाळांनी, मुलांनी, शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने आणि नवीन बाधित, बळी यांच्या प्रमाणात चढउतार होत राहिल्याने शाळा प्रत्यक्ष हजेरीने सुरू करण्याचा विषय सरकारने सध्या तरी पुढे ढकलला असून तो गणेश चतुर्थीनंतर हाती घेण्याचे ठरविले आहे.
शिक्षणक्षेत्रातील सर्वांनी लसीकरण करावे
या बैठकीत राज्यातील एकंदरीत लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी गणेशचतुर्थीनंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करून शाळांचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, मुलांबाबत नंतर काय तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तिसऱया लाटेच्या सामन्यासाठी सर्व तयारी
कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सामना करण्याची तयारी सरकारने केली आहे, अशी माहिती गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. गोमेकॉ बांबोळी तसेच उत्तर गोवा, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सर्व सज्जता करण्यात आल्याचे ते म्हणाले.
डेल्टा प्लसचा राज्यात अद्याप शिरकाव नाही ः राणे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे देखील बैठकीस उपस्थित होते. ते म्हणाले की डेल्टा प्लस कोरोनाचा गोव्यात शिरकाव झालेला नाही. रुग्णही नाही. त्यामुळे लोकांनी भीती बाळगू नये. डेल्टा कोरोनाचे काही रुग्ण मिळाले असले तरी ते बरे होत आहेत. घाबरण्याचे कारण नाही, असा दावा त्यांनी केला.