जात उत्पन्न प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांसाठी अधिक पैसेv
प्रतिनिधी/ बेळगाव
अटलजी जनस्नेही केंद्रातून पूर्तता केल्या जाणाऱया विविध प्रमाणपत्रांच्या सेवा शुल्कात वाढ झाली आहे. त्यामुळे आता जात उत्पन्न दाखल्याबरोबरच इतर शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. नागरिकांना वेळेत शासकीय कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, याकरिता ग्रामीण भागातदेखील जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रातून मिळणाऱया कागदपत्रांच्या सेवा शुल्कात 15 रुपयांनी वाढ केली आहे.
शासनाने तहसीलदार कार्यालयासह सांबरा, काकती, उचगाव, एपीएमसी मार्केट यार्ड आदी भागात जनस्नेही केंदे सुरू केली आहेत. या केंद्रातून जात-उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वारसा, फॅमिली ट्री आदी कागदपत्रांची पूर्तता केली जाते. पूर्वी प्रमाणपत्रांचे सेवा शुल्क 25 रुपये होते. त्यात आता 15 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रांच्या सेवा शुल्कासाठी 40 रुपये मोजावे लागणार आहेत.
नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जात-उत्पन्नाचा दाखला व अन्य शासकीय कागदपत्रे आवश्यक आहेत. या कागदपत्रांसाठी नागरिकांना जनस्नेही केंद्रांकडे ये-जा करावी लागते. केंद्रात शासकीय कागदपत्रांसाठी अर्ज केल्यानंतर 8 ते 10 दिवसांत कागदपत्रे मिळतात. त्यातच आता शासकीय कागदपत्रांच्या सेवा शुल्कात वाढ झाल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.