भाजपचे सदस्य विजय भोजे यांचा सीईओंना इशारा
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मॅट घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेत सध्या राजकीय आखाडा रंगला आहे. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सदस्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मॅट घोटाळ्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मॅट घोटाळ्यावरून काही दिवसांपूर्वी झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती. मॅट घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांरी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा गुरुवारी चार जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षीय सदस्यांनी दिला होता.
मात्र यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी मॅट घोटाळ्यावरून नुरा कुस्ती खेळू नये, असा खोचक सल्ला देत या प्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.