कुपवाड / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड़ (एम) परिसरातील डोंगरात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबटयाला काही तरुणांनी शिकारी कुत्र्यांच्या मदतीने पाठलाग करून पळवुन लावल्याचा प्रकार उजेड़ात आला आहे. या प्रकरणात आठजणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आठजणांना सांगलीच्या वन विभागाने नोटीसा बजावुन गुन्हे दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक उप वनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड़ (एम) परिसरातील डोंगरावर तेथील ग्रामस्थांना काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास बिबटया दिसला. ही घटना समजताच काही तरुणांनी सोबत शिकारी कुत्री घेऊन बिबटयाला हुसकावण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. अलकुड़ (एम)च्या डोंगरावरुन करोली (एम) रस्त्याच्या लगत असलेल्या तलावापर्यंत त्यांनी त्याचा पाठलाग केला होता. परंतु, काही वेळातच बिबटया ऊसाच्या फडात अदृश्य झाल्याने त्या तरुणांनी पाठलाग सोडला होता. दरम्यान, बिबटया अलकुड़ (एम) परिसरात आल्याची माहिती सांगलीच्या वनविभागाला समजल्यानंतर वनविभागाची पथके घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित काही ग्रामस्थानी काही तरुण शिकारी कुत्र्यांच्या मदतीने बिबटयाला हुसकावण्यास गेल्याचे दृष्टीस पडले, अशी माहिती ग्रामस्थानी वन अधिकाऱ्यांना दिली होती.
त्यानुसार माहिती घेऊन वनअधिकाऱ्यांनी त्या आठजणांना नोटीसा बजावून शुक्रवारी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आठ तरुणांना चौकशीसाठी शुक्रवारी सांगलीच्या वनविभाग कार्यालयात बोलावून चौकशी केली असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.