प्रतिनिधी/ धारबांदोडा
माटोजे-शिगांव येथे झालेल्या दुचाकी अपघात गंभीर जखमी झालेल्या बिंबल कुळे येथील सदाशिव उर्फ दिप्तेश दत्तू देसाई (30) या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री 11 वा. सुमारास माटोजे येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला होता.
दिप्तेश हा सरकारनियुक्त सुरक्षारक्षक म्हणून फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात कामाला होता. बुधवारी रात्री कामावरुन सुटल्यानंतर जीए 12 बी 0474 या क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरुन बिंबल कुळे येथे घरी परतत असताना वाटेत माटोजे शिगाव येथील धोकादायक वळणावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली व बराचवेळ कुणीच त्याच्या मदतीला पोचू न शकल्याने तो रस्त्यावर पडून होता. रात्री उशिरा त्याला बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना पहाटे 4 वा. त्याचा मृत्यू झाला. कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुरी यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत दिप्तेश याच्यापश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.