लाखो रूपयांचे नुकसान : ग्रामस्थ आक्रमक
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिरोडा-वेळागर सर्व्हे नं.39 मध्ये गेल्या 5 महिन्यांपासून बसविण्यांत आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरमधुन कमी व उच्च दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने या भागातील अनेक वीज ग्राहकांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे व होत आहे. सदरचा विजपुरवठा येत्या 10 दिवसांत तात्काळ पहाणी करून बिघाड काढून सुरळीत करावा. तसेच झालेली नुकसान भरपाईचा पंचनामाकरून नुकसान भरपाई देण्यांत यावी. सदरचा विजपुरवठा सुरळीत 10 दिवसांत न झाल्यास वेळागर वासिय तीव्र आंदोलन छेडतील. या आंदोलनांत विजवितरण कंपनीचे नुकसान झाल्यास त्यास वीज कंपनीच जबाबदार राहील. असा इशाराहि वेळागर वासियांनी वेंगुर्ले विज कंपनीचे उपअभियंता यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
वेंगुर्ले विज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. खटावकर यांना शिरोडा-वेळागर सर्व्हे नं. 39 मधील विज ग्राहकांनी वेळागर संघर्ष समितीचे सल्लागार जयप्रकाश चमणकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत लेखी निवेदन सादर केले. यात, या भागात विजवितरण कंपनीने 5 महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्यापासून ग्राहकांचे टी.व्ही. डीप फ्रीज, इनव्हर्टर, सेटअप बॉक्स, टय़ुबलाईटस व बल्ब अशी इलेक्ट्रीक साधने जळून सुमारे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे आणि होत आहे. शिरोडा वेळागर हा विभाग पर्यटन नकाशामध्ये आहे. या भागात मोठय़ा प्रमाणांत पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे पर्यटकांना सेवा व सुविधा देण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक विद्युत उपकरणे अतिउच्च वीज दाबामुळे जळून गेल्याने विजमंडळाने वीज ग्राहकांचे नुकसान केलेले आहे.
याबाबत ऑनलाईन पध्दतीने वीज कंपनीकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने थेट तालुका उपअभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देण्याचा निर्णय काल रविवारी वेळागर येथे वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे व सल्लागार जयप्रकाश चमणकर यांनी घेतला. त्यावेळी वीज ग्राहकांच्या उपस्थित निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार विज वितरण कंपनीचे उपअभियंता यांना आज सोमवारी निवेदन सादर करण्यांत आले.
यावेळी अन्य उपस्थितात वेळागर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आग्नेल सोज, सचिव समीर भगत, सुधीर भगत, आनंद आमरे, उदय भगत, नेल्सन सोज, आब्रास मेनास, पास्कोल फर्नांडीस, शेखर भगत, मदन आमरे, संतोष भगत, जेम्स फर्नांडीस, रूपेश तारी, प्रवीण आरोसकर, माजी जि.प. सदस्या प्रिती भगत यांसह 28 जणांचा समावेश होता. दरम्यान, शिरोडा वेळागर सर्व्हे नं. 39 मधील नवीन बसविण्यांत आलेला तो ट्रॉन्सफॉर्मर व विद्युतभार याची पहाणी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत आपण प्रत्यक्ष भेट देवून तेथील बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपअभियंता श्री. खटावकर यांनी दिले.