राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन व नेस्टले इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा उपक्रम
प्रतिनिधी / जयसिंगपूर
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शाळेच्या परिसरात टॉयलेट युनिटचा अभाव असल्यामुळे मुलींची गैरसोय होत असे, शासनाच्या माध्यमातून सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना सत्तर मुलींच्या मागे एक टॉयलेट युनिट दिले जात होते. परंतु, एकूण विद्यार्थिनींची संख्या व उपलब्ध असलेले टॉयलेट युनिट यामध्ये तफावत असल्यामुळे विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील या विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी नेस्टले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळांसाठी ३७ टॉयलेट युनिट उपलब्ध करून दिलेली आहेत.
राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून व नेस्टले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने तालुक्यात अनेक शाळांमधून टॉयलेट युनिट प्रदान करण्यात येत आहेत. दर्जेदार आणि उत्तम क्वॉलिटी असलेल्या या टॉयलेट युनिटमुळे विद्यार्थिनींची गैरसोय होणार नाही. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शाळांमधून उपलब्ध झालेल्या या सोयींमुळे विद्यार्थिनी, शिक्षक व पालक वर्गा मधून समाधान व्यक्त केले जात आहे.