प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पॉझिटिव्ह संख्या कमी झाले असून शासकीय सहापैकी एकच कोविड सेंटर सुरू ठेवण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 36 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर खाजगी कोविड केअर सेंटर मध्ये 245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाविषाणू प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला होता. शेकडो लोक कोरोना बाधित झाले होते. अनेकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. सर्व शासकीय यंत्रणांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. या कोरोनाविषाणूमुळे सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना वेळेवर उपचार व्हावेत, या हेतूने शिरोळ तालुक्यामध्ये सहा शासकीय कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. आगर भाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह, जयसिगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक कॉलेज, उदगाव येथे कुंजवन, कुरुंदवाड येथे कृष्णा घाट, जयसिंगपूर येथे मोदी हॉस्पिटल व अब्दुल लाट येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी शासकीय कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली.
सांगली, कोल्हापूर, मिरज व इचलकरंजी या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना उपचाराकरता न्यावे लागत होते. शिरोळ तालुक्यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून शासकीय व खाजगी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कमी खर्चात वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत.
तहसीलदार अपर्णा मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. शासकीय सहा कोविड केअर सेंटरची स्थापन करण्यात असले, तरी सध्या उदगाव येथील कुंजवन या एकाच ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. अन्य ठिकाणची शासकीय कोविड सेंटर बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.