बेंगळूर, मुंबई, दिल्लीत 14 ठिकाणी छापे : 74 लाख रुपये जप्त : अटक होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँगेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि खासदार डी. के. सुरेश यांच्या बेंगळूरमधील सदाशिवनगर येथील बंगल्यासह 14 ठिकाणी सीबीआय अधिकाऱयांनी सोमवारी छापे टाकले आहेत. दिल्लीत चार ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी तसेच कर्नाटकात 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान लाखो रुपये जप्त करण्यात आले असून शिवकुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
बळ्ळारी आणि पावगड परिसरात मागील काँग्रेस सरकारच्या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या सोलार पार्कमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार आणि कमिशन मिळविल्याच्या आरोपावरून शिवकुमार यांच्या निवासस्थानांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मागील वर्षी येडियुराप्पा सरकारने शिवकुमार यांची सीबीआय चौकशी करण्यास संमती दिली होती. बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी यापूर्वी प्राप्तिकर खात्याने शिवकुमार यांच्यावर छापे टाकले होते. त्यापाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कारवाई केली होती. त्यांचा चौकशीसाठी दिल्लीतील कार्यालयात बोलावून ईडीने अटक केली होती. नंतर त्यांची रवानगी तिहार कारागृहात झाली होती. जामिनावर मुक्तता झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. आता सिरा आणि राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू असतानाच सोमवारपासून त्यांच्या मागे सीबीआय अधिकाऱयांचा ससेमिरा सुरू झाला आहे.
शिवकुमार आणि त्यांच्या नातलगांच्या मालमत्तांवर छापा टाकल्याप्रकरश सीबीआयने माहिती दिली आहे. शिवकुमार, त्यांचे कुटुंबीय आणि नातलगांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यात 74.93 लाख रुपये, मालमत्तांची कागदपत्रे, बँक खात्यांशी संबंधी माहितीपत्रके, संगणकातील हार्ड डिस्क व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध मार्च महिन्यात तक्रार दाखल करून चौकशी करण्यात येत होती. या माहितीच्या आधारे कर्नाटकातील बेंगळूर, रामनगर जिल्हय़ातील दोड्डहालहळ्ळी येथे तसेच मुंबई आणि दिल्ली येथे एकूण 14 मालमत्तांवर छापे टाकून सीबीआय अधिकाऱयांनी माहिती जमा केली आहे. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील बंगल्यावर पाच सीबीआय अधिकाऱयांनी धाड टाकली. तसेच त्यांची दुपारपासून सायंकाळपर्यंत चौकशी केली. सुमारे 8 तास ही कारवाई सुरू होती.
शिवकुमार यांचे निकटवर्तीय सचिन नारायण यांच्या हासन येथील सिल्व्हर ज्युबिली पार्कमधील बंगल्याला देखील सीबीआय अधिकाऱयांनी लक्ष्य केले. कारवाईवेळी सचिन नारायण तेथे नव्हते. त्यामुळे अधिकाऱयांनी सचिन यांचे बंधू चेतन नारायण यांच्याकडून माहिती जमाविली.
समर्थकांकडून ‘सीबीआय गो बॅक’चा नारा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बेंगळूरमधील सदाशिवनगर येथील निवासस्थानावर सीबीआय अधिकाऱयांनी छापा टाकल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासूनच घराबाहेर गर्दी केली. यावेळी ‘सीबीआय गो बॅक’ अशी घोषणा देण्यात येत होती. चाहत्यांची गर्दी वाढल्याने आंदोलन तीव्र झाले, दरम्यान, किरकोळ धक्काबुक्कीची घटनाही घडली. त्यामुळे शिवकुमार यांच्या घराबाहेरील पोलीस फौजफाटाही वाढविण्यात आला.
षड्यंत्रांना आपण घाबरत नाही : शिवकुमार
शिवकुमार यांची सीबीआय अधिकाऱयांनी सायंकाळपर्यंत चौकशी केली. चौकशीनंतर शिवकुमार घराबाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जयघोष केला. यावेळी प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, राज्याच्या ऍडव्होकेट जनरलांनीनको म्हटले, तरी मुख्यमंत्री येडियुराप्पांच्या दबावामुळे सीबीआय चौकशीला रवानगी देण्यात आली आहे. सीबीआय अधिकाऱयांनी त्यांचे काम केले आहे. आपण त्यांना सहकार्य केले आहे. आपल्या घरामध्ये 50 लाखांची रोकड सापडल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. निवडणूक कालवधीत अशा गोष्टी सामान्य बाब आहे. राजकारणातील अशा षड्यंत्रांना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली.
द्वेषाच्या राजकारणाचा कळस : रणदीप सुर्जेवाला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानावरील सीबीआय धाड म्हणजे द्वेषाच्या राजकारणाचा कळस आहे. सीबीआय धाडी म्हणजे भाजपचा निवडणुकीची प्रक्रियाच आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीमुळे सरकार का करेल, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून दुरुपयोग होत आहे, असा आरोप काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.