प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवछत्रपतींचा इतिहास पुढील पिंढयांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने निर्माण केलेले ‘शिवगर्जना’ हे महानाटय़ 24 जानेवारीपासून कोल्हापुरात सादर होणार आहे. आशिया खंडातील या भव्यदिव्य महानाटय़ाच्या पोस्टरचे अनावरण मंगळवारी (7 जानेवारी) खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. हा समारंभ शहरातील एका मोठय़ा हॉटेलमध्ये पार पडला.
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांनी शक्ती आणि युक्तीच्या बळावर यवनांना नमवले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक विघ्न आले. प्रत्येक प्रसंगावर मात करत राजांनी स्वराज्याचा विस्तार केला. छत्रपतीपद धारण करून त्यांनी मराठीजनांसाठी रामराज्य निर्माण केले. अशा या शिवरायांचा जीवनपट पिढय़ा-न-पिढय़ा पर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी ‘शिवगर्जना’ हे महानाटय़ दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करून, छत्रपती शिवरायांचा इतिहास 3 तासात बांधण्याचे कौशल्यपूर्ण काम केले आहे. रेणू यादव यांची निर्मिती असलेले हे आशिया खंडातील सर्वात भव्य दिव्य महानाटय़ येत्या 24 जानेवारी रोजी कोल्हापुरामध्ये सादर होणार आहे.
या महानाटय़ मध्येच 300 ते 400 कलाकार, हत्ती, घोडे, उंट या सोबतच भव्य आणि दिव्य असा फिरता रंगमंच आहे. शिवप्रेमींसाठी हे महानाटय़ म्हणजे शिवरायांचा जीवनपट डोळ्यासमोरून उलगडत जाणारे असणार आहे. 2014 साली या महानाटय़ाची निर्मिती झाली. महानाटयाचे प्रयोग संपूर्ण राज्यासह परराज्यात आणि जम्मू-काश्मीर येथे मराठा बटालियनसाठी देखील झाले आहेत. आता पुन्हा हे महानाटय़ सादरीकरणासाठी सज्ज झाले असल्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या महानाटयाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी या नाटकासाठी प्रायोजक असलेल्या मान्यवरांचे कौतुक केले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, महानाटय़ाची निर्माती रेणू यादव आदी मान्यवर उपस्थित होते.