प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर शिवसेना व शिवसेना महिला आघाडीतर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख निमिष शहा यांनी दिली.
कांगा कॉलनी सदरबझार पूर्व भाग येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील वृद्ध, शालेय विद्यार्थी, बोर्डिंग मधील विद्यार्थी, बेगर नागरिक यांना चादर, टॉवेल, वह्या, कंपास, शालेय साहित्य, फळे, मिष्टान्न, बिस्किटे वाटप करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते तसेच कृष्णाखोरे महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना सातारा सांगली संपर्क प्रमुख नामदार नितिन बानुगडे पाटील व गृहराज्य मंत्री नामदार शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, युवासेना सातारा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह भोसले, सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथराव ओंबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांची उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी युवा सेना भारतीय विद्यार्थी सेना, भारतीय एस. टी. कामगार सेना, वाहतूक सेना, महिला आघाडी, आजी-माजी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सातारा शहर प्रमुख निमिश शहा व सौ. मिनल शहा यांनी केले आहे.