प्रतिनिधी / बेळगाव :
एसपीएम रोड येथील शिवाजी उद्यानाशेजारी असलेल्या मनपाच्या ग्रंथालय इमारतीवर अखेर जेसीबी फिरविण्यात आला असून गुरुवारी सदर इमारत भुईसपाट झाली आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत डिजीटल लायब्ररी उभारण्यात येणार आहे. याकरिता 1 कोटी 30 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याने सदर इमारत हटविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शहरवासियांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी डिजीटल लायब्ररी उभारण्याचा प्रस्ताव आहे. डिजीटल आणि संगणकीय युग असल्याने सध्याची पिढी पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे. सर्रास तरुणांचा ओढा अत्याधुनिक सुविधांकडे आहे. या पिढीची गरज ओळखून स्मार्ट सिटी योजनेत डिजीटल लायब्ररीची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या काळातील ग्रंथालय म्हणून ओळख असलेल्या मनपाच्या इमारतीच्या जागेत डिजीटल लायब्ररी निर्माण करण्यात येणार आहे. एसपीएम रोड येथील शिवाजी उद्यानाशेजारील महापालिकेची ग्रंथालय इमारत मोडकळीस आल्याने सदर इमारत हटवून नवीन बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यानुसार ग्रंथालयाची इमारत हटविण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात ही इमारत हटवून जागा मोकळी करण्यात आली. सर्वात जुने आणि नगरपालिकेच्या कालावधीतील हे ग्रंथालय अखेर कालबाह्य झाले आहे. या ठिकाणी आता लवकरच सुसज्ज अशी दुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. डिजीटल लायब्ररीच्या इमारतीसाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर काम सुरू करण्यात आले असून दोन मजली इमारत बांधून टेरेसवर खुले वाचनालय करण्याचा प्रस्ताव आहे. डिजीटल लायब्ररीकरिता 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासियांना चांगली सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.