प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात चोवीसतास योजनेंतर्गत जलवाहिन्या तसेच गॅसवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील रस्त्यावर खड्डा खोदून ठेवण्यात आला असून वाहनधारकांना अडथळा ठरत आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
चोवीसतास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी खोदाई सत्रास प्रारंभ करण्यात आला आहे. रस्ता खोदाई केल्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत. पण काही ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्यात येत नसल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याशेजारी पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. पण काही रस्त्यांवर पेव्हर्स नसल्याने काँक्रिटचा रस्ता फोडण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील रस्त्यावर डीपी स्कूलला जाणाऱया रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली आहे. पण याठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांमुळे वाहने वळविण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच सध्या शाळा सुरू झाल्याने वाहनधारकांची गर्दी होत असते. खड्डय़ामुळे वाहनाची गर्दी होवून कोंडी निर्माण होत आहे.
सध्या सर्वत्र जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपूर्ण शहरात चोवीसतास पाणी योजनेच्या जलवाहिन्याचे जाळे घालण्यात येणार आहे. शहरातील रस्ते खोदण्यात येणार आहेत. त्यामुळे खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.