ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
रंगरेथ भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. वेढा घट्ट होताना पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. पण जवानांनी संयम दाखवत दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, त्याने गोळीबार सुरुच ठेवला. सुरक्षा दलाने याला प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, 24 तासांपूर्वी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याची सुरक्षा दलांनी हत्या केली. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.