वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या क्रिकेट संचालकपदी लंकेचा माजी कसोटीवीर आणि फलंदाज कुमार संगकाराची नियुक्ती केल्याची घोषणा रविवारी या संघाच्या प्रँचायजीने केली.
संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या प्रशिक्षण आराखडय़ामध्यें बदल करण्यात महत्त्वाचे योगदान देणारा कुमार संगकारा हा सध्या मेरीलबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) अध्यक्ष आहे. एखाद्या क्रिकेट क्लबचा क्रिकेटपटूंच्या लिलावाचा आराखडा तसेच संघाचे धोरण, नवोदित क्रिकेटपटूंचा शोध आणि विकास त्याचप्रमाणे प्रँचायजीच्या संपूर्ण क्रिकेट पद्धतीचे धोरण तयार करण्याची जबाबदारी आता राजस्थान रॉयल्स संघाने संगकारावर सोपविली आहे. नागपूरमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची अकादमी असून या अकादमीत सुधारणा करण्यासाठी संगकारावर महत्त्वाची जबाबदारी राहील. आयपीएल स्पर्धेत मैदानावर यश मिळविण्यासाठी संघाचा मूलभूत पाया भक्कम करण्याकरिता संगकाराची मदत घेतली जाईल. लंकेच्या संगकाराने आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये 28 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या गेल्या 46 वर्षांच्या कालावधीत फलंदाजीत सर्वाधिक सरासरी राखणारा संगकारा हा पहिला फलंदाज आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या प्रँचायजीनी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या जागी संजु सॅमसनची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.