प्रतिनिधी /बेळगाव
संगीत कलाकार संघाची मासिक बैठक नुकतीच शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात पार पडली. रंजीता पर्वतीकर व डॉ. रोहिणी गंगाधर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला.
रंजीता यांनी राग अहिर भैरव विलंबित आणि दृतबंदीशी गावून तराना पेश केला. त्यांना संतोष पुरी यांनी तबला साथ तर सारंग कुलकर्णी यांनी हार्मोनियम साथ दिली. मध्यांतरानंतर डॉ. रोहिणी गंगाधर यांचे गायन झाले. त्यांनी राग भटीयारमध्ये विलंबित ख्याल सदर केला. त्यांना तबला साथ जितेंद्र साबण्णावर, तर वामन वागुकर यांनी हार्मोनियम साथ दिली. ज्येष्ट तबलावादक बंडोपंत कुलकर्णी यांनी कलाकारांचे पुष्प देऊन स्वागत केले.
प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर आणि नाटय़ संगीत क्षेत्रातल्या अग्रणी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर यांनी उपस्थित कलाकारांचे स्वागत केले. कार्यकारिणी सदस्य गुरूराज कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. सदस्य जगन्नाथ धर्माधिकारी यांनी आपल्या पंचाहत्तरीनिमित्त संघाला 5 हजार रुपयांची देणगी दिली. सेपेटरी प्रभाकर शहापूरकर यांनी आभार मानले.