एसटी सेवेला मोठा फटका
मोजक्याच फेऱया होत्या सुरू
वार्ताहर / सावंतवाडी:
संचारबंदी लागू होताच गुरुवारी सकाळपासून सावंतवाडी एस.टी. आगार सुने-सुने होते. ग्रामीण भागात आता पुन्हा एकदा एस.टी. बस सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून सुरू झालेल्या व अलिकडेच रुळावर आलेल्या ग्रामीण भागातील एस.टी. सेवेला आता पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. सावंतवाडी आगारातून गुरुवारी कणकवली, पणजी, शिरोडा, दोडामार्ग व जिल्हा मुख्यालय ओरोस एवढय़ाच बसेस वेळेनुसार सोडण्यात आल्या, अशी माहिती आगार व्यवस्थापक पाडाळे यांनी दिली.
संचारबंदीमुळे एस.टी. सेवेला मोठा फटका बसला आहे. गेल्या मार्चपासून जवळपास ऑक्टोबरपर्यंत गावागावातील एस.टी. बसेस पूर्णतः बंद होत्या. मात्र, दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर जानेवारी महिन्यापासून वस्तीच्या सेवाही सुरू झाल्या होत्या. आता सर्व पूर्वपदावर येत असतानाच अचानक फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा दुसऱया कोरोनाचीची लाट पसरू लागली. गेल्या महिन्यापासून जिल्हय़ात कोरोना रुग्णांनी कहर केला आहे. एसटी चालक-वाहक काही पॉझिटिव्ह वाढू लागले होते. आता 15 एप्रिलपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने एस.टी. सेवा सुरू असल्या तरी जर प्रवासी वाढले तरच बससेवा सुरू ठेवली जाईल. सध्या सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-कणकवली सकाळी 7 व 9 वाजता, पणजी सकाळी 7:30, शिरोडा सकाळी 7.45, दुपारी 2:30, दोडामार्ग सकाळी 9 या बससेवा सुरू ठेवल्या जाणार आहेत. तसेच जिल्हा मुख्यालय ही बसही सुरू ठेवली जाणार आहे, असे आगारातून सांगण्यात आले. आज सावंतवाडी-कणकवली, सावंतवाडी-पणजी व शिरोडा याच बसफेऱया सुटल्या होत्या. बाकी कोणीही प्रवासी स्थानकाकडे वळले नाहीत. त्यामुळे जवळपास 100 हून अधिक गाडय़ा पुन्हा एकदा स्थानकात प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. काही मोजक्याच चालक-वाहकांना डय़ुटी लावण्यात आली आहे. बाकीच्या सर्वांना सद्यस्थितीत घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संचारबंदीचा मोठा फटका एस.टी. चालक-वाहकाबरोबरच अन्य कर्मचाऱयांनाही बसला आहे.
15 एप्रिलपासून सावंतवाडी आगारातून सावंतवाडी – कणकवली 7.00, 9.00 वाजता सावंतवाडी – पणजी, सावंतवाडी – शिरोडा 7.45, 13.30, 15.30, सावंतवाडी – दोडामार्ग 9.00 वाजता सुटणार आहे.. CompleteDuration