टोकियो ऑलिम्पिकची संधी हुकल्याने चानू फेडरेशनवर नाराज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय वेटलिफ्टर के. संजिता चानू हिच्यावरील उत्तेजक सेवनाचे आरोप आंतरराष्ट्रीय वेटलिफ्ंिटग फेडरेशनने मागे घेतले आहेत. तिच्याकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांची हाताळणी पारदर्शक झाली नसल्यामुळे हे आरोप मागे घेतले असल्याचे स्पष्टीकरण फेडरेशनने दिले. अर्थात, संजिता चानूचे यामुळे अजिबात समाधान झालेले नाही. फेडरेशनने याबाबत माफी मागावी आणि आपल्याला जो मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल भरपाईही द्यावी, अशी तिने मागणी केली आहे.
आंतरराष्ट्रीय फेडरेशनने चानूवरील आरोप मागे घेण्याचा निर्णय जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) शिफारशीनुसार घेतला. 26 वर्षीय चानूने प्रारंभापासूनच आपण निर्दोष असल्याचा वेळोवेळी दावा केला होता. आंतरराष्ट्रीय फेडरेशनने आपल्या अंतिम निर्णयाची माहिती ईमेलद्वारे दिली.
यापूर्वी मागील महिन्यात वाडाने सॉल्ट लेक सिटीमधील प्रयोगशाळेचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच प्रयोगशाळेत चानूकडून घेण्यात आलेले नमुने तपासले गेले होते.
चानूने 2014 व 2018 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली असून 53 किलोग्रॅम वजनगटात तिच्या खात्यावर राष्ट्रकुलचा स्नॅचमधील विक्रम देखील आहे. चानूकडून घेण्यात आलेल्या दोन नमुन्यांवर विभिन्न क्रमांक नेंद केले गेले. त्यामुळे, हा गोंधळ झाल्याचे नंतर उघडकीस आले. नोव्हेंबर 2017 मध्ये तिची चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीत ती ऍनाबोलिक टेस्टोस्टेरोनचे सेवन केल्याप्रकरणी दोषी असल्याचे फेडरेशनने जाहीर केले होते. सदर प्रयोगशाळेने आपला अहवाल दि. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फेडरेशनकडे सुपूर्द केला होता. याप्रकरणी चानूवर दि. 15 मे 2018 पासून निलंबन लादले गेले. त्याच वर्षात तिचा ब चाचणीचा अहवाल आला आणि त्यातही ती दोषी असल्याचे अहवालात नमूद केले गेले होते.
पुढे, 18 ऑक्टोबर 2019 रोजी तिच्या प्रतिनिधीने आयडब्ल्यूएफच्या लवादासमोर हजेरी लावली आणि 22 जानेवारी 2019 रोजी तिच्यावरील तात्पुरते निलंबन मागे घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्ंिटग फेडरेशनने याप्रकरणी आपली चूक कबूल केली आणि त्यानंतर चानूवरील आरोप मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला.