देशात दिवसभरात 43 हजार 846 नव्या बाधितांची नोंद – 197 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाची गती पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार 846 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. नव्या बाधितांमुळे आतापर्यंत देशातील एकूण बाधितांचा आकडा 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांचा आकडा 3 लाख 9 हजार 87 इतका झाला आहे. दुसरीकडे, देशात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 95.96 टक्के आहे. गेल्या 24 तासात 22 हजार 956 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण कायम आहे. येथे शनिवारी दिवसभरात 27 हजार 126 रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ पंजाबात 2,578 तर केरळमध्ये 2,078 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात काही राज्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग दररोज झपाटय़ाने वाढत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशात गेल्या चोवीस तासात 77.7 टक्के नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 83.14 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या सहा राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात चोवीस तासात सर्वाधिक मृत्यू (92) झाले आहेत. पंजाबमध्ये 38 तर केरळमध्ये 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. नवीन रुग्ण मृत्यूंमध्ये सहा राज्यांचे प्रमाण 86.8 टक्के आहे. देशात आतापर्यंत तब्बल 1 लाख 59 हजार 755 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.