दिवसभरात 44 हजार 111 नवे रुग्ण-738 जणांचा मृत्यू- 57 हजार 477 जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
देशात गेल्या 24 तासात करोनाचे 44 हजार 111 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याचदरम्यान 57 हजारांहून अधिक जणांना डिस्चार्ज मिळाल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा पाच लाखांच्या खाली आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 4 लाख 95 हजार 533 इतकी झाली आहे. गेले काही दिवस नवीन कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खालील पातळीवर घुटमळत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय बाधितांची संख्या 97 दिवसांनंतर प्रथमच पाच लाखांच्या खाली आली आहे. देशाचा कोविड रिकव्हरी रेट आता 97.06 टक्क्यांवर गेला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.35 टक्क्यांवर आला आहे. गेले सलग 26 दिवस हा दर पाच टक्क्यांच्या खाली राहिला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 738 रुग्णांचा बळी गेला आहे. तर 57 हजार 477 जणांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 3 हजार 362 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण बाधितांपैकी 2 कोटी 96 लाख 05 हजार 779 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर 4 लाख 1 हजार 50 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आता देशात 4 लाख 95 हजार 533 इतके सक्रिय रुग्ण आहेत.