प्रतिनिधी/ सातारा
येथील सदरबझारमधील नविन म्हाडा कॉलनीशेजारील बंद घरचा मागील दरवाजा तोडून भरदिवसा चोरटय़ांनी चोरी केल्याची घटना बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यामध्ये अज्ञात चोरटय़ांनी तीन तोळ्याच्या सोन्याच्या दागिण्यांसह 3 हजाराची रोकड लांबविली असून एकूण लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. भरदिवसा घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन दिनकर किरतकुडवे हे आपल्या कुटुंबियासोबत नविन म्हाडा कॉलनी, सदरबझार सातारा येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी सचिन हे एलआयसी ऑफिस तर त्यांच्या पत्नी पाटबंधारे विभागात कामास सकाळी 10 वाजता घराबाहेर पडल्या. तर त्यांचा मुलगा कॉलेजला गेला. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी किरतकुवडे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी घरातील कपाटे उघडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यांनी कपाटातील 3 तोळ्याचे मंगळसुत्र व 7 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सचिन यांच्या पत्नी दुपारी 2 च्या सुमारास जेवण करण्यासाठी आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, हे श्वान घरापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले.
दरम्यान, सचिन यांचे घर सदरबझार परिसरात आहे. त्यांच्या घराशेजारी असणारे काही बंगले बंद अवस्थेत आहेत. मात्र, चोरटय़ाने सचिन यांचेच घर टार्गेट करून तब्ब्ल एक लाखाचा ऐवज लंपास केला. भरदिवसा नागरीवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरफोडीत 12 हजाराचा ऐवज लंपास
दरवाजाचा कडी कोयंडी तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिणे असा 12 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल हणमंत पवार (वय 33, रा. देशपांडे शिवराज कॉलनी देगाव रोड अंकुर हॉस्पीटल शेजारी सातारा. मुळ रा. बोरगाव, ता कोरेगाव) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा दि. 6 ऑक्टोंबर 2019 रोजी रात्री 11.30 वाजता अज्ञात चोरटय़ाने तोडून सोन्या-चांदीचे दागिणे असा 11 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी राहुल पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.