बायोलॉजिकल ई कंपनीकडून विकसित
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या हैदराबाद औषध कंपनी ‘बायोलॉजिकल ई’कडून सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील ‘कोर्बवॅक्स’ लस सादर केली जाणार आहे. सुमारे दोन महिन्यांनी उपलब्ध होणारी ही लस बायोलॉजिकल ई कंपनीकडून विकसित करण्यात येत आहे. ही आरबीडी प्रोटीन सबयुनिट व्हॅक्सिन असून त्याची सध्या तिसऱया टप्प्यातील परीक्षण सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱया परीक्षणात या लसीचे चांगले निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘मिशन कोविड सुरक्षा-भारतीय व्हॅक्सिन विकास मिशन’मार्फत लस निर्मितीत सहकार्य केले जात आहे. बायोलॉजिकल ईच्या लसप्रकल्पाला केंद्र सरकारने प्रारंभापासूनच सहाय्य केले आहे. केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाने या प्रकल्पाकरता 100 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत पुरविली आहे. तसेच सर्व अध्ययनांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध केली आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सरकारकडून लसींचे 45.37 कोटींहून अधिक डोस उपलब्ध करण्यात आले आहे. राज्ये-केंद्रशासित प्रदेश तसेच खासगी रुग्णालयांकडे सध्या लसींचे 3.09 कोटींहून अधिक डोस उपलब्ध आहेत. बायोलॉजिकल ई या कंपनीसोबतच देशात लवकरच झायडस कॅडिला या कंपनीची डीएनए लस उपलब्ध होणार आहे. या नव्या लसींमुळे देशातील कोरोनावरील लसीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.