बेळगाव /प्रतिनिधी :
संपूर्ण जगातच कोरोना साथीचा आजार सुरू आहे. अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे विविध नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या काळात खासगी डॉक्टर उपचार करण्यास तयार नाहीत. दुकानदार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रीप्शन) औषध देण्यास तयार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
बऱयाच वेळा साधा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी होते तेव्हा बरेच जण मेडिकल दुकानामधूनच औषधे घेतात. मात्र, आता दुकानदार औषध देण्यास तयार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. तेव्हा काही औषधे दुकानामधून वितरित करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पावसाळी हवामानामुळे सर्दी, खोकला हे आजार उद्भवतात. अशा काळात डॉक्टर नसल्यामुळे नागरिकांना औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानाकडे धाव घ्यावी लागत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि औषधे वितरित करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, वैजनाथ भोगण, नारायण पाटील, बाळू नाईक, मयुरेश काकतकर, दीपक मस्के, अनिकेत दासानी, विजय गवाने, अतुल सांबरेकर, भरत जाधव, वासू सामजी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.