चीनमध्ये जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. या महिलेच्या पापण्यांच्या केसांची लांबी 8 इंच इतकी आहे. या पापण्या भगवान बुद्ध यांनी उपहाराच्या स्वरुपात दिल्याचा दावा महिलेने केला आहे. चीनच्या चांगझोउ शहरात राहणाऱया यू जियानजिया यांनी 2016 मध्ये 4.88 इंचांच्या पापण्यांसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले होते.
5 वर्षांत लांबी दुप्पट
मागील 5 वर्षांमध्ये यू जियानजिया यांच्या पापण्यांची लांबी जवळपास दुप्पट झाली आहे. याचबरोबर डाव्या डोळय़ांच्या वरील पापण्यांचे केस 8 इंचाच्या (20.5 सेमी) नव्या विक्रमापर्यंत पोहोचले आहेत. जियानजियाच्या पापण्यांचे केस आता मानेपर्यंत पोहोचले आहेत. डॉक्टरही हा प्रकार पाहून आश्चर्यचकित आहेत.
भगवान बुद्धांचा आशीर्वाद
लांब पापण्या भगवान बुद्धांचा आशीवार्द असल्याचे महिलेचे मानणे आहे. याकरता तिने दीड वर्षांपर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात साधना केली आहे. पापण्यांच्या केसांच्या अधिक लांबीचे कारण जाणून घेण्यासाठी अनेक तज्ञ डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनाही यामागील रहस्य उलगडता आलेले नसल्याचे त्या म्हणाल्या.