महामारी ढकलून 91 टक्के मतदान
प्रतिनिधी/ कराड
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 73.25 टक्के मतदान झाले. दरम्यान मयत सभासद वगळून हयात मतदारांचा विचार करता 91 टक्के मतदान झाले आहे. 148 मतदान केंद्रांवर 34 हजार 532 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेत कडक पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. महामारी ढकलून चुरशीने मतदान झाले. 66 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून गुरूवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान तीनही पॅनेलप्रमुखांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून पृष्णा कारखान्याच्या ऐतिहासिक निवडणुकीत कोण बाजी मारते हे गुरूवारी स्पष्ट होईल. रेठरे बुद्रकमध्ये आजीमाजी तीन चेअरमन निवडणूक लढवत असल्याने या गावासह अनेक गावांत क्रॉस व्होटींग झाल्याची चर्चा आहे.
कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. सध्या कोरोनाचा काळ असल्याने कारखान्याच्या निवडणूक प्रचारांना नियमांच्या अटी प्रशासनाने घालून दिल्या होत्या. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने निवडणुकीत ताकद लावली होती. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलने पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव मोहिते रयत पॅनेलनेही आपली प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार केला. गेल्या पंधरा दिवसात तीनही पॅनेलनी सभासदांच्या भेटीगाठी घेत प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी 29 जून रोजी निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी कराड, वाळवा, कडेगाव, शिराळा तालुक्यात 148 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकांमधील वाढता संघर्ष पाहता प्रशासनाने खबरदारी घेत प्रत्येक मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवला होता. सभासद मतदाराशिवाय केंद्रावर कोणालाही फिरकून दिले जात नव्हते. शिवाय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रयत्न करत होते. तरीही झालेले मतदान उस्फूर्त असेच आहे.
34 हजार 532 मतदारांनी बजावला हक्क
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी तणावपूर्ण वातावरणात चुरशीने मतदान झाले. मंगळवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. कोरोनाचा काळ असूनही सभासदांच्यात उत्साह दिसून येत होता. सकाळच्या वेळेत रेठरे, काले, वडगांव, जखिणवाडीसह अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे 21 टक्के तर त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत दुप्पट 45 टक्के मतदान झाले. दुपारी 2 पर्यंत 60 टक्के मतदारांनी मतदान केले. दुपारी 4 पर्यंत 71 टक्के मतदारांनी हक्क बजावला. तर सायंकाळी शेवटच्या टप्प्यापर्यंत एकूण 47 हजार 145 मतदारांपैकी सुमारे 34 हजार 532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी 73.25 वर पोहचली.
मयत मतदार वगळल्यास 91 टक्के मतदान
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मयत मतदारांच्या वारस नोंदीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. कारखान्याच्या 47 हजार 145 मतदारांपैकी सुमारे 9 हजार सभासद मतदार मयत झाले आहेत. मयत सभासदांचा आकडा वगळून मंगळवारच्या मतदानाची टक्केवारी काढल्यास अंदाजे 91 टक्के सभासदांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
विद्यमान चेअरमन व जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवी भोसले, विनायक भोसले यांनी रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी आपल्या कुटुंबीयांसह रेठरे बुद्रुक मराठी शाळेतील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते, रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रेठरेत मतदानाचा हक्क बजावला.
नेते, अधिकारी यांच्या मतदान केंद्रांना भेटी
कारखान्याची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. निवडणूक निरीक्षक आर टी शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, संजयकुमार सुद्रिक व जनार्दन शिंदे यांनी संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली.
दरम्यान सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते, उदयसिंह पाटील, रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजीत मोहिते, आमदार मोहनराव कदम, डॉ. जितेश कदम यांच्यासह नेत्यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या.