भाजप नेते मुकूल रॉय अन् राहुल सिन्हा यांची कसोटी : तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रियो मलिक यांच्यासमोर आव्हान : अर्जुन सिंगांचे पुत्र उमेदवार
पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 43 जागांवर 306 उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. या टप्प्यात भाजप आणि तृणमूलच नव्हे तर काँग्रेस-डाव्या आघाडीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. याचबरोबर भाजपचे मुकुल रॉय, तृणमूल मंत्री ज्योतिप्रियो मलिक आणि चंद्रिमा भट्टाचार्य यासारख्या प्रमुख नेत्यांची अग्निपरीक्षा तर शांतनू ठाकूर यांचे बंधू सुब्रत यांच्या भवितव्याचा निर्णयही होणार आहे.
6 व्या टप्प्यात 4 जिल्हय़ांमधील 43 मतदारसंघांकरता मतदान पार पडले आहे. यात दिनाजपूर जिल्हय़ातील 9 जागा, नादिया जिल्हय़ातील 17 पैकी 9 जागा, उत्तर 24 परगण्यातील 33 पैकी 17 जागा आणि वर्धमान जिल्हय़ातील 24 पैकी 8 जागांवर मतदान झाले आहे. या जिल्हय़ांमधील समीकरणे पाहिल्यास येथे मतुआ समुदायाचा चांगला प्रभाव असून त्यांना स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी तृणमूल आणि भाजपने पूर्ण शक्ती झोकून दिली होती.
मुकुल रॉय अन् पुत्राची कसोटी
कृष्णनगर उत्तर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले मुकुल रॉय मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात तृणमूलकडून कौशानी मुखर्जी निवडणूक लढवत आहेत. मुखर्जी प्रख्यात टॉलिवूड अभिनेत्री आहेत. पण हा मतदारसंघ मुकुल रॉय यांचा बालेकिल्ला मानला जातो. 20 वर्षांनी या मतदारसंघात ते निवडणूक लढवत आहेत. बीजपूर मतदारसंघात मुकुल रॉय यांचे पुत्र शुभ्रांग्शू हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात तृणमूलच्या वतीने सुबोध अधिकारी उभे ठाकले आहेत. शुभ्रांग्शू यांनी 2016 च्या निवडणुकीत तृणमूलच्या तिकीटावर विजय मिळविला होता.
दमदममध्ये त्रिकोणी लढत
दमदम उत्तर मतदारसंघ अत्यंत हायप्रोफाइल मानला जातोय. यंदा येथे त्रिकोणी लढत आहे. माकपचे विद्यमान आमदार तन्मय भट्टाचार्य पुन्हा निवडणूक लढवत आहे. तर माकपचा बालेकिल्ला सर करण्यासाठी तृणमूलने चंद्रिमा भट्टाचार्य यांनी मैदानात उतरविले आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना मजूमदार देखील चुरशीचे आव्हान देत आहेत.
अर्जुन सिंग यांचे पुत्रही मैदानात
उत्तर 24 परगणा जिल्हय़ातील भाटपाडा मतदारसंघावर सर्वांच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत. येथून भाजप खासदार अर्जुन सिंग यांचे पुत्र पवन सिंग निवडणुकीच्या मैदानात आहेत. अर्जुन सिंग यांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. 2019 मध्ये अर्जुन सिंग यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत भाटपाडा मतदारसंघात पवन सिंग यांनी यश मिळविले होते. पण त्यांच्या विरोधात अर्जुन सिंग यांच्या बहिणीचे पती सुनील सिंग उभे राहिले आहेत. तर तृणमूलकडून जितेंद्र साहा आणि काँग्रेसकडून धर्मेंद्र साहा निवडणूक लढवत आहेत.
अरिंदम भट्टाचार्यांसमोर आव्हान
जगतदाल विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत दिसून येत आहे. या मतदारसंघात भाजपने अरिंदम भट्टाचार्य यांनी उमेदवारी दिली आहे. अरिंदम यांनी 2016 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर शांतिपूर मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात तृणमूलकडून सोमनाथ श्याम तर डाव्या पक्षांककडून नेमाई साह उभे ठाकले आहेत.
राहुल सिन्हा विरुद्ध ज्योतिप्रियो
उत्तर 24 परगण्यातील हाबरा मतदारसंघात भाजप अन् तृणमूल यांच्यात चुरशीचा संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांनी मजबूत उमेदवार उभे केले आहेत. भाजपच्या वतीने राहुल सिन्हा मैदानात आहेत. तर येथील दोनवेळचे आमदार आणि मंत्री ज्योतिप्रियो मलिक तृणमूलच्या वतीने राजकीय खिंड लढवत आहेत.